Uncategorized

खेबवडे येथे विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

खेबवडे (सलीम शेख) : खेबवडे (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास विजेच्या धक्क्याने कंत्राटी वायरमन राहुल मारुती कांजर (वय ३०, रा. निगवे, ता. करवीर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खेबवडे येथील पूर्वेकडील पाणंद शेतातील डीपीवरील विद्युत पुरवठा बंद करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

राहुल कांजर हे गेल्या सहा वर्षांपासून वडकशिवाले सेंटर अंतर्गत खेबवडे येथे कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी गावाच्या पूर्वेकडील बाजूला विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याची पाहणी करण्यासाठी ते गेले असता, डीपीवरील काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, राहुल यांच्या सव्वा महिन्याच्या मुलीचे, राजनंदिनीचे काही दिवसांपूर्वीच बारसे झाले होते. बारशाच्या तिसऱ्याच दिवशी राजनंदिनी पितृहीन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


राहुल यांच्या पश्चात पत्नी नम्रता, त्यांची नवजात मुलगी राजनंदिनी, वडील मारुती, आई संगीता आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. राहुल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मूळ गावी, निगवे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेमुळे कांजर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button