महापालिका प्रशासनासोबत विविध शिष्टमंडळे आणि समाजांच्या प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर, तसेच विविध शिष्टमंडळे आणि समाजाच्या प्रश्नांवर आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आज निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये फेरीवाले संघटना, दुकानदार आणि गाळाधारकांचे प्रश्न, वारसाहक्क नियुक्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, नागरी सुविधा, रस्त्यांची कामे, आरोग्य व स्वच्छता, तसेच विविध समाज आणि सामाजिक संस्थांचे प्रश्न समजावून घेण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर या सर्व समस्या प्रभावीपणे मांडण्यात आल्या असून, त्या त्वरित सोडविण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केल्या.
या बैठकीला आमदार सतेज पाटील, फेरीवाले व दुकानगाळे धारक संघटनांचे शिष्टमंडळ, विविध समाजाचे प्रतिनिधी, कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक अत्यंत उपयुक्त ठरली.