कोगनोळी टोलनाक्यावर धावत्या ट्रकला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही!

कोगनोळी (सलीम शेख ) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्याजवळ बुधवारी रात्री एका मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. टायर फुटल्याने हा अपघात घडला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकहून महाराष्ट्राकडे जाणारा एक मालवाहू ट्रक कोगनोळी टोलनाक्याजवळ आला असता त्याचा पुढील टायर अचानक फुटला. यामुळे ट्रकची बॉडी महामार्गावर घासली जाऊन डिझेलची टाकी फुटली आणि घर्षणामुळे ट्रकला तत्काळ आग लागली.
कोगनोळी टोलनाका हा नेहमीच वर्दळीचा असतो. या अपघातामुळे टोलनाक्यावरील कर्मचारी आणि उपस्थित वाहनचालकांची एकच धावपळ उडाली. काही काळासाठी टोलनाका बंद ठेवण्यात आला. सुमारे अर्धा तास वाहनांना तसेच सोडण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच निपाणी व कागल अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. टोल कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आणि तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे विशेष. आग विझवल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.