न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सरन्यायाधीशपदी निवड : कोल्हापुरात आनंदोत्सव!

कोल्हापूर (सलीम शेख) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रा.सु. गवई यांचे सुपुत्र आणि विद्यमान राष्ट्रीय सचिव राजेंद्र गवई यांचे बंधू, महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताच्या ५२ व्या सरन्यायाधीशपदी नुकतीच शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणाचा आनंद कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि आंबेडकरवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बिंदू चौकात एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. राष्ट्रीय उपाध्यक्ष पी.एस. कांबळे यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात बबन शिंदे यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सरन्यायाधीशपदापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. मराठा महासंघाचे भाऊसाहेब काळे, वसंतराव मुळीक आणि सोमनाथ घोडेराव यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
गणी अजरेकर, विद्याधर कांबळे, बाजीराव गायकवाड आणि दिलीप कांबळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना साखर आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.