गडमुडशिंगीत छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा शिवमय वातावरणात संपन्न

गडमुडशिंगी (सलीम शेख) : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील संयुक्त भगवा चौकाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा १२ ते १४ मे दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भव्य रंगमंच, राजमहालाची आकर्षक प्रतिकृती आणि विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण चौक शिवमय वातावरणाने भारलेला होता.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, १२ मे रोजी गावातील लहान मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित प्रेरणादायी पोवाडे सादर केले. यानंतर पारंपरिक धनगरी ओवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१३ मे रोजी शासकीय तसेच निमशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, विविध क्षेत्रांतील खेळाडू आणि त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याने समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यानंतर उपस्थितांना मल्लखांबाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा अनुभव घेता आला.
कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी, १४ मे रोजी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, ज्यात अनेक युवकांनी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. सायंकाळच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा केलेले नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर, गटनेते व ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, प्रदीप झांबरे, संजय पाटील, अरुण शिरगावे, कृष्णात ठमके, जयशिवराय तरुण तालीम मंडळाचे आधारस्तंभ संभाजी दांगट, के.डी. फॅन्स ग्रुपचे कुणाल दांगट, अध्यक्ष अमोल यादव, निलेश लोहार, अक्षय डकरे, स्वप्नील बनकर, दत्ता नेर्ले, संतोष दांगट, कपिल दांगट, रामा माळी, प्रवीण देसाई, राजू पनुत्रे, विनायक लोहार तसेच भगवा चौक, माळवाडी, गावभागातील तरुण मंडळ, विविध राजकीय नेते आणि नवयुवकांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमामुळे गडमुडशिंगीमध्ये उत्साहाचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले होते.