माद्याळजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सावर्डे येथील युवक ठार!

- कागल: तालुक्यातील माद्याळ गावच्या हद्दीत दुपारी १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सावर्डे बु|| (ता. कागल) येथील २१ वर्षीय युवक रितेश तानाजी पाटील जागीच ठार झाला. रितेश हा गडहिंग्लज येथे परीक्षेसाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश पाटील (वय २१, रा. सावर्डे बु||) हा आज एमएच ०९ एफटी २४५१ क्रमांकाच्या मोटरसायकलवरून गडहिंग्लज येथे परीक्षेसाठी निघाला होता. माद्याळ गावच्या हद्दीत संतोष राणे यांच्या शेताजवळ असताना, समोरून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीच्या टाकीचा पत्रा फाटून रितेशच्या उजव्या मांडीला गंभीर जखम झाली आणि त्याला जबर मार लागला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची फिर्याद दिपक यशवंत पाटील यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि रितेशचा मृतदेह मुरगूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात सावर्डे येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रितेशच्या पश्चात वडील, बहीण, आजी आणि आजोबा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सावर्डे गावात शोककळा पसरली आहे. मुरगूड पोलीस अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत.