महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरनियंत्रणासाठी ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णा-भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने ‘महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP)’ अंतर्गत ९६३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मित्र संस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर येथे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, सन २०१९ च्या पूरस्थितीच्या पाहणीदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. सद्यस्थितीत उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला गती मिळाली. जागतिक बँकेच्या माध्यमातून ३२०० कोटी रुपयांचा कोल्हापूर व सांगली पूर नियंत्रण प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक बँकेचा ७० टक्के आणि महाराष्ट्र शासनाचा ३० टक्के हिस्सा असणार आहे.


या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात प्रामुख्याने कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली आणि मिरज-कुपवाड या शहरांमधील पुराच्या पाण्याचा निचरा करणे, जलसंपदा विभागामार्फत नद्या व नाल्यांची उंची व रुंदी वाढवणे, गाळ काढणे आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे मॅन्युअली करणे आदी कामांचा समावेश आहे.


सद्यस्थितीत मंजूर झालेल्या ९६३ कोटी रुपयांच्या कामांमध्ये महापालिका क्षेत्रातील पुराच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा उभारणे, सल्लागाराची नियुक्ती करणे आणि प्रकल्प अंमलबजावणी युनिटसाठी प्रकल्प व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार नियुक्ती करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या पूर, उष्णतेची लाट, वादळे यांसारख्या आपत्तींपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button