संभाजी महाराज व्याख्यानमालेतून तरुणांना प्रेरणा; आर्थिक सक्षमतेचा मंत्र!

कोल्हापूर (सलीम शेख) : दसरा चौकातील शाहू स्मारकात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नामदेवराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून आणि युवकांना मार्गदर्शन केले.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी आणि स्वतःला सक्षमपणे उभे राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थकारण समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे महत्त्वपूर्ण आवाहन प्रा. जाधव यांनी केले. ते स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती व्याख्यानमालेत बोलत होते.
यावेळी प्रा. जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांचे आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक स्थैर्य नसल्यामुळेच बहुजन समाजाच्या चळवळी अनेकदा मागे पडतात. आजच्या शिक्षण व्यवस्थेत बहुजन समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना आचरणात आणल्यास निश्चितच खरी प्रगती साधता येईल, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
या व्याख्यानमालेत पृथ्वीराज राणे, प्रा. मधुकर पाटील आणि पायल देवसकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, कल्याणी माणगावे, पारस ओसवाल, संग्राम साळोखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष पाहुणे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, शहराध्यक्ष अभिजित कांजर, विवेक मिठारी, राहुल पाटील, संतोष बरगे आणि सरदार पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले होते. या व्याख्यानमालेमुळे तरुणांना नवी प्रेरणा मिळाली आणि छत्रपतींच्या विचारांना आत्मसात करण्याची ऊर्जा मिळाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.