करवीर तालुक्यात पेन्शनधारकांसाठी आधार लिंकची सोय, तहसीलदारांचे महत्त्वपूर्ण पाऊल!

उचगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, निराधार यांसारख्या शासकीय पेन्शन योजनांपासून आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थी वंचित होते. याची दखल घेत, करवीर तालुका प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली आहे. तहसीलदार यांच्या आदेशानुसार, आता तालुक्यातील प्रत्येक गावच्या तलाठी कार्यालयामध्ये पेन्शनधारकांसाठी आधार कार्ड लिंक करण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तहसीलदारांना याबाबत निवेदन दिले होते. निवेदनात, अनेक पेन्शनधारक वयोवृद्ध असल्याने त्यांना आधार लिंकसाठी होणारा त्रास निदर्शनास आणून दिला होता. याची गंभीर दखल घेत, तहसीलदारांनी प्रत्येक तलाठी कार्यालयात दोन दिवसांचा कॅम्प आयोजित करण्याचे आणि संबंधित पेन्शनधारकांना बोलावून त्यांचे आधार कार्ड लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, उंचगाव येथील तलाठी कार्यालयात उंचगावचे तलाठी शरद पाटील आणि कोतवाल विशाल सुतार यांनी पेन्शनधारकांचे आधार कार्ड लिंक करण्याचे काम त्वरित सुरू केले आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव आणि दीपक रेडेकर यांनी तलाठी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी पेन्शनधारकांना कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेतली आणि काम सुरळीत सुरू आहे की नाही याची खात्री केली.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, “करवीर तालुक्यातील प्रत्येक गावांमधील पेन्शनधारकांनी आपापल्या तलाठी कार्यालयात जाऊन आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावे.”
गावातच आधार कार्ड लिंक करण्याची सोय उपलब्ध झाल्यामुळे पेन्शनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रशासनाच्या या तत्पर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.