रुई येथे मगरीच्या हल्ल्यात रुकडीचा मच्छीमार गंभीर जखमी

रुई (सलीम शेख ) : हातकणंगले तालुक्यातील रुई येथील पंचगंगा नदीपात्रात मासेमारी करत असलेल्या एका मच्छीमारावर मगरीने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात रुकडी येथील बिरदेव पांडुरंग बागडी (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या बहादुरीमुळे त्यांचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिरदेव बागडी हे नेहमीप्रमाणे रुईच्या नदीपात्रात मासेमारीसाठी उतरले होते. पाण्यात असलेल्या गाळात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्या डाव्या पायाला पकडले आणि त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. बागडी यांच्यासोबत असलेल्या सुजित बागडी आणि इतर मच्छीमारांनी हे पाहून त्वरित धाव घेतली आणि मगरीच्या तावडीतून त्यांची सुटका केली. या झटापटीत बिरदेव बागडी यांच्या डाव्या पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या पायाला तेरा टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान, रुई आणि परिसरातील पंचगंगा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून मगरीचा वावर वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.