Uncategorized

डॉ. दीपक शेटे यांची दुर्मीळ संग्रहालयवत गणित प्रयोगशाळा – 50 लाखांचा खर्च, १५ वर्षांची मेहनत

कोल्हापूर (पत्रकार- सुभाष भोसले)  शिक्षणाची तळमळ, गणित विषयावर असलेलं निस्सीम प्रेम आणि दुर्मीळ वस्तूंविषयी असलेली ओढ यांचा अनोखा संगम म्हणजे डॉ. दीपक शेटे यांची स्वतःच्या घरात उभारलेली गणित प्रयोगशाळा. गेल्या १५ वर्षांच्या अथक प्रयत्नातून आणि 50 लाख रुपये स्वतः खर्च करून, डॉ. शेटे यांनी ही प्रयोगशाळा साकारली आहे. ही प्रयोगशाळा केवळ गणित विषयापुरती मर्यादित नसून, ती एक संग्रहालय, अभ्यास केंद्र आणि अनुभवात्मक शिक्षणाचे माध्यम बनली आहे.

या प्रयोगशाळेत डॉ. शेटे यांनी जुन्या वजन-मापन उपकरणे, प्राचीन नाणी व नोटा, पोस्टाची तिकिटं, दुर्मीळ पेन्सिली, गणितीय तक्ते, विविध प्रकारचे तराजू, मापनासाठी वापरण्यात येणाऱ्या पट्ट्या, आणि अगदी दुर्बिणी यांसारख्या वस्तूंचा समृद्ध संग्रह केला आहे. या वस्तूंमधून विद्यार्थ्यांना केवळ गणिताचे नव्हे, तर इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र आणि तांत्रिकतेचेही प्रात्यक्षिक अनुभव घेता येतात.

*डॉ. शेटे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर कोल्हापूर व उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, विस्तार अधिकारी विश्वास सुतार प्राथमिक शिक्षण विभाग अधीक्षक श्री उदय सरनाईक , विस्तार अधिकारी श्री रविंद्र ठोकळ व प्रोग्रमर श्री पुरेकर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून या प्रयोगशाळेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी अधिकाऱ्यांना उपकरणे व जुने तक्ते आणि मोजमाप कसे शिकवता येतील याविषयी चर्चा केली.याचा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कसा उपयोग करता येईल याविषयी सविस्तर चर्चा झाली . शिक्षण विभागाने त्यांच्या या प्रयोगशील आणि अनुभवाधारित उपक्रमाचे भरभरून कौतुक केले*.

ही प्रयोगशाळा शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभव देणारे शिक्षण साधन, आणि संशोधकांसाठी अभ्यासाचा अमूल्य ठेवा ठरू शकते. डॉ. शेटे यांच्या म्हणण्यानुसार, “पुस्तकी गणिताच्या पलिकडे जाऊन, स्पर्श, दृश्य आणि कृतीतून शिकवणं ही काळाची गरज आहे.”

डॉ. शेटे यांचा हा उपक्रम राज्यातील इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो. त्यांच्या तळमळीला आणि प्रयत्नांना शैक्षणिक क्षेत्रात मान्यता मिळून, शासनस्तरावरूनही प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी कलाशिक्षक अतुल सुतार उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button