शिरोळ हरोली येथे दोन कुटुंबांतील हाणामारीत एकाचा खून!

शिरोळ (सलीम शेख) : शिरोळ तालुक्यातील हरोली गावात सोमवारी सायंकाळी बोरवेलच्या पाण्यावरून आणि एका महिलेकडे पाहण्यावरून झालेल्या दोन कुटुंबांतील हाणामारीत ४६ वर्षीय विजय एकनाथ मुघलखुडे यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने संशयित गुजरे यांच्या घरावर दगडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे
हरोली येथील माळभागावर सोमवारी सायंकाळी बोअरवेलचे पाणी आणि एका महिलेकडे पाहण्याच्या कारणावरून मुघलखुडे आणि गुजरे कुटुंबात जोरदार हाणामारी झाली. संशयित ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे याच्या घरासमोर विजय मुघलखुडे आणि अजय कांबळे यांनी महिलेकडे पाहण्याबद्दल जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी गुजरेला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावर गुजरेने घरातून धारदार शस्त्र आणून मुघलखुडे आणि कांबळे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विजय मुघलखुडे गंभीर जखमी झाले, तर अजय कांबळे किरकोळ जखमी झाले.
जखमींना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजय मुघलखुडे यांचा मृत्यू झाला, तर जखमी अजय कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या काही लोकांनी संशयित गुजरे यांच्या घरावर दगडफेक केली. घटनेनंतर संशयित गुजरेचे आई-वडील आणि पत्नी शिरोळ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. रात्री उशिरा शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. कोल्हापूर येथील गुन्हे अन्वेषण पथकानेही परिस्थितीची पाहणी केली. संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच, शिरोळ पोलिसांचे एक पथक सांगली शासकीय रुग्णालयात घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले होते.
या घटनेमुळे हरोली गावात खळबळ उडाली असून, तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. संशयित गुजरेच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.