महाराष्ट्र ग्रामीण

संभापूर हादरले: पोटदुखीने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, परिसरात हळहळ

हातकणंगले (सलीम शेख) : हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा पोटदुखी आणि उलट्यांच्या त्रासाने अवघ्या काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संभापूरसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

संभापूर येथील पोवार मळ्यात राहणाऱ्या सागर पोवार यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. त्यांचा सहा वर्षांचा मुलगा वरद सागर पोवार आणि चार वर्षांचा विराज सागर पोवार यांना मंगळवारी पहाटे अचानक पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तात्काळ पेठवडगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्रास कमी झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


गुरुवारी दुपारी पुन्हा वरद आणि विराज यांना पोटदुखीचा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांना त्याच खाजगी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच विराजची प्रकृती अचानक खालावली आणि गुरुवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विराजचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दुसरीकडे, वरदची प्रकृतीही चिंताजनक बनल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर आज, शुक्रवारी सकाळी संपली आणि त्याचाही मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन सख्खी भावंडे दगावल्याने पोवार कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
विराजच्या मृत्यूनंतर पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच या दोन्ही मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वैद्यकीय क्षेत्राकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या दोन्ही मुलांची आई पूजा सागर पोवार यांनाही पोटदुखीचा त्रास झाल्याने कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पेठवडगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा अशाप्रकारे अचानक मृत्यू झाल्याने संभापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button