तामगावात आढळला परप्रांतीय पुरुषाचा मृतदेह!

गोकुळ शिरगाव: तामगाव, ता. करवीर येथील पाटील मळ्यात आज एका परप्रांतीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृताचे नाव प्रमोद सामंत राय (वय ४७ वर्षे) असून तो ओडिसाचा रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद गेल्या चार वर्षांपासून चंद्रकांत हराळे यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होता. सोमवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्या खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांच्या ही बाब लक्षात आली.
प्रमोद गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत फाईन कास्ट कंपनीमध्ये मजूर म्हणून काम करत होता आणि तो सहसा कुणाच्याही संपर्कात नसायचा. तो एकटाच राहत असे आणि त्याला दारूचे व्यसन होते, असे स्थानिकांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.