तळसंदे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम: आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ अभियानाचा शुभारंभ!

तळसंदे ता. हातकणंगले (सलीम शेख) : दि. 1: महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून, तळसंदे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीने ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2’ अंतर्गत ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू’ आणि ‘दुश्यमान शाश्वत स्वच्छता’ या महत्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम आज, १ मे २०२५ रोजी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या शुभहस्ते आणि हातकणंगले पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. अशोकराव माने यांनी ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “गावाची स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे आणि तळसंदे ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे. प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी योगदान द्यावे.”
गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी ग्रामपंचायतीच्या या योजनेसाठी शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान सरपंच शुभांगी कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या दृष्टिकोनाबद्दल माहिती दिली आणि सर्वांना या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. उपसरपंच संतोष शेवाळे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा कुंभार, लता चव्हाण पाटील, धोंडीराम लोहार, बाबासो पाटील, भाग्यश्री पाटील, सविता संकपाळ, शारदा भोसले, किरण मोहिते, प्रिया पाटील, अमित मोहिते, अमोल चव्हाण, धैर्यशील शिंदे, मेघा चव्हाण तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुनील सुतार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळसंदे ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावाला स्वच्छतेची नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.