महाराष्ट्र ग्रामीण

विकासवाडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साकारणार; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासवाडी (ता. करवीर) येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. या नियोजित स्टेडियमच्या जागेची पाहणी आमदार अमल महाडिक यांनी नुकतीच केली. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार स्वप्नील रावडे आणि भूमापन अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. अंतरावर, विकासवाडीजवळ सुमारे ३० ते ३५ एकर जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार आहे. कोल्हापूर शहराचा सातत्याने विकास होत असून जिल्ह्याच्या एका बाजूला विमानतळ तर दुसऱ्या बाजूला गोकुळ शिरगाव व कागल औद्योगिक वसाहतीमुळे विकासाची भर पडत आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणे हे क्रिकेट शौकिनांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.


आमदार महाडिक यांनी स्टेडियमच्या जागेची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. “क्रीडापंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या शिरपेचात हे स्टेडियम मानाचा तुरा रोवेल आणि कोल्हापूरला एक नवी ओळख देईल,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्टेडियमच्या उभारणीत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. “क्रिकेट प्रेमींसाठी हे स्टेडियम एक उत्कृष्ट सुविधा केंद्र ठरेल यात शंका नाही,” असेही महाडिक म्हणाले.


यावेळी सर्कल उदय लांबोरे, तलाठी अनिल पार्वतीवर, कोतवाल रवींद्र पाटील, नेर्ली विकासवाडीचे सरपंच अंकुश धनगर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button