चंदूर येथे गोकुळतर्फे आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त “उत्कृष्ट वासरू संवर्धन” स्पर्धा संपन्न!

चंदूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) यांच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दुग्ध दिनाचे औचित्य साधून चंदूर येथे “उत्कृष्ट वासरू संवर्धन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ गोकुळ संघाचे संचालक तथा माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
डॉ. मिणचेकर यांनी आपल्या भाषणात, वासरू संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी निरोगी आणि उत्तम वासरे असणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी पटवून दिले. गोकुळ संघ दूध उत्पादकांच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध असून, अशा स्पर्धांमधून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होते, असेही ते म्हणाले.
यावेळी श्री बिरदेव दूध संस्थेचे चेअरमन मारुती पुजारी, महालक्ष्मी दूध संस्थेचे प्रकाश झेले, पंचगंगा दूध संस्थेचे वकील झेले, देवराज पाटील, गोकुळ संघाचे डॉ. जाधव, डॉ. सातवेकर, सुपरवायझर उदय आंबी यांच्यासह परिसरातील दूध उत्पादक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या दूध उत्पादकांनी आपल्या उत्कृष्ट वासरे प्रदर्शनासाठी आणली होती. विजेत्या वासरांच्या मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमामुळे दूध उत्पादकांना वासरू संवर्धनाबद्दल अधिक माहिती मिळाली आणि त्यांना प्रोत्साहन मिळाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. गोकुळ संघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.