दुचाकीच्या डिकीतून १ लाखाची रोकड लंपास!

कणेरी (इरफान मुल्ला ) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील एचडीएफसी बँकेच्या आवारात दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीच्या डिकीतून एक लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल धनाजी मगर (वय ३०, रा. कणेरीवाडी, ता. करवीर, मूळगाव पाचवड, ता. भुदरगड) यांनी त्यांची मोपेड (एम.एच. ०९ ई.एफ. २८७०) बँकेच्या आवारात उभी केली होती. याच दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली.
या प्रकरणी राहुल धनाजी मगर यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक टी. जे. मगदूम करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी आपल्या वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.