गांधीनगर येथील दुकानातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश! चौघांना अटक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : गांधीनगर येथील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी योगेश पाडळकर, स्वयंम सावंत, सम्राट शेळके आणि स्वरूप शेळके या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १ कोटी ७८ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन चोरट्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१४ जून २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजता गांधीनगर येथील व्यापारी कैलास गोरड यांच्या दुकानासमोर पार्क केलेल्या टेम्पोमधून लाखो रुपयांची रक्कम चोरीला गेली होती. कैलास गोरड यांनी गांधीनगर पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी उपनिरीक्षक संतोष गळवे आणि जालिंदर जाधव यांची दोन पथके तयार करून तपास सुरू केला. उपनिरीक्षक संतोष गळवे आणि हवालदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉकी स्टेडियम परिसरात सापळा रचण्यात आला.
दोन मोटरसायकलींवरून आलेल्या योगेश पडळकर, स्वरूप शेळके, स्वयंम सावंत आणि सम्राट शेळके या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या चौघांनी चोरीची कबुली दिली.
कटाचे सूत्रधार आणि चोरीची पद्धत पोलिसांच्या माहितीनुसार, गुड लक स्टेशनरीचे व्यापारी प्रकाश वाधाने यांच्याकडे स्वरूप शेळके कामाला होता. त्याला कैलास कोरडी यांच्या आर्थिक व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती होती. योगेश पडळकर आणि इतर साथीदार हे स्वरूप शेळकेचे मित्र होते. या सर्वांनी गेल्या महिन्याभरापासून राजेंद्र नगर येथील एका अल्पवयीन मुलाच्या घरात चोरीचा कट रचला होता. त्यानुसार, स्वरूप शेळकेने कैलास यांच्या मालकीच्या टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये मोठी रक्कम असल्याची माहिती दिली.
१४ जून २०२५ च्या मध्यरात्री १ वाजता, या चौघांनी गुड लक स्टेशनरीच्या कंपाऊंडमधील पत्र्याचे छत उचकटून, पार्किंग केलेल्या टेम्पोच्या काचा फोडून डॅशबोर्डजवळील कप्प्यातून रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली. ही रक्कम गोठ्या उर्फ स्वयंम सावंतच्या मंगळवार पेठेतील खोलीत ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानुसार पोलिसांनी तब्बल १ कोटी ७८ लाख रुपये रोख जप्त केले. तसेच, या गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण १ कोटी ७८ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
या यशस्वी तपासाबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपास पथकाला विशेष बक्षीस जाहीर केले आहे.