सह्यगिरी दप्तर पाटी योजनेचा भव्य वितरण सोहळा: १०७ विद्यार्थ्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य!

गगनबावडा (सलीम शेख) : निवडे आणि डोला येथे सह्यगिरी दप्तर पाटी योजनेअंतर्गत शालेय साहित्याचे वाटप मोठ्या उत्साहात पार पडले. या योजनेच्या सर्वात मोठ्या वितरण कार्यक्रमात एकूण १०७ विद्यार्थ्यांना दप्तरे आणि पाट्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी मोठा आधार मिळाला आहे.
विद्या मंदिर, निवडे आणि यशवंत माध्यमिक विद्यालय, असं डोला येथील लाभार्थी विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी एम. टी. पाटील सर, डोईफोडे मॅडम, माळी सर, पवार सर, घाटगे सर आणि सुप्रीम शिंदे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दप्तरे व पाट्यांचे वाटप केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी योजनेचे सर्व मदतगार, हितचिंतक, पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या आठवड्याभरात उर्वरित सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंत दप्तरे आणि पाट्या पोहोचवल्या जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली. सह्यगिरी दप्तर पाटी योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत असल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.