वेतवडेच्या आनंदा आडाव यांना राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक; गगनबावडा तालुक्याचा गौरव वाढवला!

गगनबावडा (सलीम शेख) : गगनबावडा तालुक्यातील वेतवडे गावचे शेतकरी आनंदा दादू आडाव यांनी राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून तालुक्याचा गौरव वाढवला आहे. गगनबावडा तालुक्यातून प्रथमच एखाद्या शेतकऱ्याने या स्पर्धेत यश मिळवल्यामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
आनंदा आडाव यांच्या भातशेतीतील अथक मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय पद्धतींचा अवलंब आणि शाश्वत शेतीचा आग्रह यांमुळेच त्यांना हे घवघवीत यश मिळाले आहे. या यशाबद्दल बोलताना आडाव यांनी नम्रपणे सांगितले, “हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या कुटुंबासह संपूर्ण गगनबावड्याचे आहे.”
तालुका कृषी अधिकारी आर.बी. गायकवाड यांनी या यशाबद्दल कौतुक गेले. गगनबावडा तालुक्यातील वातावरण भातशेतीसाठी काही प्रमाणात प्रतिकूल असतानाही, आडाव यांनी मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशाने इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.