गगनबावड्यात चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तीन लघु पाटबंधारे भरले; नद्या दुथडी भरून वाहू लागल्या!

गगनबावडा (विलास पाटील): गगनबावडा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून, तीन लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अंदुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच, वेसरफ आणि कोदे हे लघु प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत. दरम्यान, कुंभी मध्यम प्रकल्प ६० टक्के भरला असून, त्यातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर, ओव्हरफ्लो झालेल्या कोदे धरणातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तालुक्यातील सर्वच नद्या सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रांमधील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे. आतापर्यंत गगनबावडा धरण क्षेत्रात एकूण १२६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.