ग्राइंडरचा तुकडा लागून कामगाराचा मृत्यू!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील राजे फिटिंग शॉपमध्ये कामावर असताना, ग्राइंडरचा तुकडा लागून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (१४ जून २०२५) सायंकाळी घडली.
अनिल शंभू महतो (वय ३०, रा. चैनपूर भवानीपूर बाजार, जि. पूर्वी चंपारण, बिहार, सध्या रा. नेर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीमधील ए-२५ येथील राजे फिटिंग शॉपमध्ये अनिल महतो हा ७ इंची ग्राइंडर मशीनने जॉब फिनिशिंगचे काम करत होता. त्यावेळी अचानक ग्राइंडर मशीनचे व्हील तुटले आणि त्याचा एक तुकडा अनिलच्या उजव्या बाजूच्या छातीवर खोलवर लागला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती युवराज विलास पाटील (वय ३९, व्यवसाय कारखानदार, रा. सांगाव, ता. कागल) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार पोवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.