महाराष्ट्र ग्रामीण

पुणे-बेंगलोर महामार्गाच्या संथ गतीमुळे अपघातांत वाढ; गोकुळ शिरगावातील खडीनेही धोका वाढवला!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाने घेतलेली संथ गती सध्या वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत असून, अपघातांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. या अनिश्चिततेत आणखी भर म्हणून, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतून जाणारा सर्विस रोड आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या हॉटेल प्रीतीजवळील वळणावर पसरलेल्या खडीने दुचाकीस्वारांसाठी नवा धोका निर्माण केला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि प्रशासनाबद्दल नाराजी पसरली आहे.


पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे, तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य आणि मातीचे ढिगारे पडून आहेत. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळी आणि खराब हवामानात चालकांना मार्ग ओळखणे कठीण होत आहे. अपुऱ्या फलकांमुळे आणि सूचनांच्या अभावामुळेही वाहनचालकांची दिशाभूल होत असून, त्यामुळे सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
गोकुळ शिरगावमधील सर्विस रोडवरील खडीचा नवा धोकाया महामार्गावरील धोक्यांमध्ये आता गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील सर्विस रोडवरील नव्या समस्येची भर पडली आहे. हा सर्विस रोड हॉटेल प्रीतीजवळ तीव्र वळणाने कागल-शिरोली राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. काही दिवसांपूर्वीच येथे पडलेल्या एका मोठ्या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, या पॅचवर्कमध्ये वापरलेली खडी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरली आहे.


वळणाच्या ठिकाणी ही खडी पसरल्यामुळे दुचाकीस्वारांना आपली वाहने नियंत्रित करणे अत्यंत कठीण झाले आहे. खडीवरून चाक घसरून पडल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातांना बळी पडत आहेत. किरकोळ दुखापती नित्याच्या झाल्या असून, गंभीर अपघातांची भीती वाढली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो आणि औद्योगिक वसाहतीमुळे येथे मोठ्या वाहनांचीही सतत ये-जा असते, ज्यामुळे दुचाकीस्वारांचा जीव अधिक धोक्यात येत आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील संथ कामामुळे होणारे अपघात आणि गोकुळ शिरगावमधील सर्विस रोडवरील खडीमुळे निर्माण झालेला धोका, यामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. “आधीच महामार्गावरील काम जीवघेणे ठरत आहे, त्यात आता आमच्या घराजवळच्या रस्त्यावरही प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे धोका निर्माण झाला आहे,” असे एका संतप्त नागरिकाने सांगितले. ही पसरलेली खडी तातडीने काढून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या दोन्ही गंभीर समस्यांवर तातडीने लक्ष देऊन, योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
प्रशासनाने तातडीने या गंभीर समस्यांची दखल घेऊन, महामार्गावरील काम जलद गतीने पूर्ण करावे आणि गोकुळ शिरगावमधील सर्विस रोडवरील खडी त्वरित हटवून रस्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button