गोकुळ शिरगावमध्ये ढगफुटीसदृश्य पावसात अडकलेल्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवले!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव येथील पूलखाली ढगफुटीसदृश्य पावसामुळे पाण्याच्या वाढलेल्या पातळीत अडकलेल्या एका ३८ वर्षीय तरुणाला स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले. सुरेश नायर असे या तरुणाचे नाव असून, तो तामिळनाडू येथील मूळ रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगाव येथील छत्रपती शाहू महाराज नगर येथे राहणारा आणि सिमेंट पाईप कारखान्यात काम करणारा सुरेश नायर गुरुवारी बाजारासाठी गेला होता. सायंकाळच्या सुमारास अचानक ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पूलखालील ओढ्याच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आणि सुरेश नायर पाण्यात अडकून पडला.
त्याला पाण्यात अडकलेले पाहून स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. सुरुवातीला दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सुरेशचा हात निसटला आणि तो पुन्हा पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत तो एका झाडाला जाऊन अडकला.
त्यानंतर ग्रामस्थांनी अधिक ताकदीने प्रयत्न करत त्याला झाडाजवळून सुखरूप बाहेर काढले. यावेळी बाजीराव पाटील, ओमकार पाटील, गौरव पाटील, रणजीत पाटील, अथर्व पाटील आणि रविंद्र मिठारी या तरुणांनी सुरेश नायरला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या बचावकार्यावेळी मोठ्या संख्येने तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या धाडसी आणि समयसूचकतेमुळे एका तरुणाचा जीव वाचू शकला.