महाराष्ट्र ग्रामीण

गावं आमच्या हक्काची, कोणाच्या बापाची नाहीत!” – हद्दवाढविरोधी कृती समिती आक्रमक, न्यायालयीन लढ्याचा निर्धार!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत दिलेल्या सूचनेनंतर हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या वीस गावांचे लोकप्रतिनिधी संतप्त झाले आहेत.कोल्हापूर येथे या गावांच्या सरपंचांची एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत प्रसंगी न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीत “गावं आमच्या हक्काची आहेत, कोणाच्या बापाची नाहीत” अशा घोषणा देत, हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली. हद्दवाढ करण्याऐवजी प्राधिकरण सक्षम करून गावांचा विकास करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. विशेषतः आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना असल्या तरी, आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. त्यामुळे आता रस्त्यावरच्या आंदोलनासोबतच कायदेशीर लढा देण्याचे ठरले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वी अनेकदा गावांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मंत्रालयात बैठक घेऊन ते हद्दवाढीसाठी दबाव आणत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केला.
या बैठकीत उजाळईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते किरण अडसूळ आदींनी आपली मनोगते व्यक्त करत, हद्दवाढीला गावांचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले.
बैठकीला बालिंग्याच्या सरपंच राखी भवड, पाचगावच्या सरपंच प्रियंका पाटील, नागदेवाडीच्या सरपंच अमृता पोवार, वडिवडे सरपंच रूपाली कुसाळे, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, नागावच्या सरपंच विमल शिंदे, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, मोरेवाडीचे सरपंच ए.व्ही. कांबळे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, पाडळीचे सरपंच तानाजी पालकर, आंबेवाडीचे सरपंच मारुती पाटील, पिरवाडीचे सरपंच अनिता खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या निर्धारामुळे आता कोल्हापूरच्या हद्दवाढीचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button