सेंटर फॉर रेनेसाचा दोन दिवसीय समर कॅम्प उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद हेरले येथे आयोजित कॅम्पमध्ये विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या नैपुण्याला मिळाला वाव!

हेरले (सलीम शेख ) : सेंटर फॉर रेनेसा संस्थेच्या वतीने हेरले येथे आयोजित दोन दिवसीय समर कॅम्प नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कॅम्पमध्ये विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना देण्यात आली, ज्याला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये विज्ञान प्रात्यक्षिके, कलानिर्मिती, निसर्ग निरीक्षण, समूह खेळ, नेतृत्वगुण विकास आणि संवाद कौशल्य वृद्धी अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सर्व उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आले. यामध्ये प्रा. अजय शिंदे, प्रियांका घरत (IIT, मुंबई), कपिल मुळे, किरण गवळी, डॉ. अनमोल कोठाडिया, डॉ. सूरज चौगुले, डॉ. आझम मकानदार, मंदार वैद्य यांसारख्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या अध्यक्षा रेहाना मुरसल यांनी यावेळी विद्यार्थ्यांमधील कुतूहल आणि सर्जनशीलतेला योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. “अशा कॅम्पमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते,” असे त्या म्हणाल्या. या समर कॅम्पमध्ये एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पालकांनीही कॅम्पविषयी समाधान व्यक्त करत, भविष्यात अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
हा संपूर्ण कॅम्प मुलांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला असून, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सेंटर फॉर रेनेसा संस्थेचे आभार मानले. रेहाना मुरसल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कॅम्पमधील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. मुबीन मनगोळी, अख्तर मुल्ला, शकील अरब, मोहम्मदसैफ मुल्ला, समीर बागवान, इब्राहीम इंचानालकर, ॲड. ए. बी. मुरसल, झाकीर संदे, यास्मिन देसाई, मलिका शेख, आयुब मुल्ला, नुसरत बागवान, रासिका मुल्ला, गौस खतीब, बशीर पठाण, मुसा शेख, भाईजान देसाई यांनी हे समर कॅम्प यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.