पुणे-बेंगळूरु महामार्गावर मुरुमामुळे अपघातांचे सावट; वाहनधारक त्रस्त!

कागल (सलीम शेख): पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते विश्रामगृह या टप्प्यात सुरू असलेल्या सहा-पदरीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपुऱ्या गटारींच्या कामासाठी खोदलेला मुरुम थेट महामार्गावर टाकला जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आज, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका वृद्धाचा अपघात थोडक्यात टळला, ज्यामुळे या गंभीर समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
खोदकामातून निघालेले मोठे दगड आणि धोंडे रस्त्यावर विखुरल्यामुळे वाहनधारकांना प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय, या भागातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्याच्या कडा खचल्या असून, बाजूचा मुरुम पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेला आहे.
या संदर्भात महामार्गाचे अधिकारी संतोष घोलप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, जोपर्यंत गटारीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत काढलेला मुरुम रस्त्यावरच राहणार आहे. त्यांच्या या उत्तरामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर पसरलेल्या या मुरुमामुळे आणि दगडधोंड्यांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याने, संबंधित महामार्ग अधिकाऱ्यांनी तातडीने हा मुरुम रस्त्यावरून बाजूला करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.