हातकणंगले तालुक्यात हिवताप जनजागृती मोहीम; आरोग्य विभागाकडून घरोघरी मार्गदर्शन!

हातकणंगले (सलीम शेख ) : सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका लक्षात घेता, प्राथमिक आरोग्य केंद्र, पट्टणकोडोली अंतर्गत गावांमध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. पट्टणकोडोली आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील चंदूर, रुई, इंगळी, पट्टणकोडोली आणि तळंदगे या गावांमध्ये ही व्यापक मोहीम सुरू आहे.
या मोहिमेदरम्यान, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांना डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया आणि अशा इतर डासांमुळे होणाऱ्या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली जात आहे. यात या आजारांची कारणे, त्यांची लक्षणे आणि उपलब्ध उपचारांबद्दल लोकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
डासांची उत्पत्ती स्वच्छ, साचलेल्या पाण्यात होत असल्याने, आरोग्य पथक नागरिकांना सिमेंट हौद, प्लास्टिक बॅरेल आणि सिंटेक्स टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ धुऊन, पुसून आणि कोरड्या करून भरण्याचे आवाहन करत आहे. तसेच, परिसर स्वच्छ ठेवणे, टाकाऊ वस्तूंची योग्य विल्हेवाट लावणे, फ्रिजचे ट्रे नियमित स्वच्छ करणे आणि रात्रीच्या वेळी मच्छरदाणीचा वापर करणे यांसारख्या प्रतिबंधक उपायांवरही भर दिला जात आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी पाटील आणि डॉ. नंदिनी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. सामुदायिक आरोग्य अधिकारी अतुल राजापुरे, सुभाष कांबळे, बबलू सनदी (आरोग्य सहाय्यक), विकास सोनुले, इम्रान नायकवडे, उमेश जाधव, प्रवीण भोपळे (आरोग्य सेवक), वर्षाराणी बडे, कविता लंबे (आरोग्य सेविका) आणि गावातील सर्व आशा स्वयंसेविका या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत.
आरोग्य विभागाने गावातील नागरिकांना या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून डासांमुळे पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालता येईल.