हुपरी नगरपरिषद निवडणुकीसाठी नकाशावर आधारित प्रभाग रचनेची मागणी; इंगळी पूरग्रस्त वसाहतीचा समावेश करण्याची मागणी!

हुपरी (सलीम शेख ) : हुपरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना ही शहराच्या नकाशाप्रमाणेच करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मागणीसोबतच इंगळी येथील पूरग्रस्त वसाहत सध्या नगरपरिषदेच्या हद्दीत येत असल्याने तिचाही प्रशासनाने प्रभाग रचनेत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता आणि लोकसंख्येची समानता या दोन्ही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. शहराच्या नकाशाचा आधार घेतल्यास प्रभागांची रचना अधिक सुटसुटीत आणि न्यायपूर्ण होईल, असे त्यांचे मत आहे.
याशिवाय, इंगळी येथील पूरग्रस्त वसाहत ही हुपरी नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट आहे. त्यामुळे, या वसाहतीमधील नागरिकांना नगरपरिषदेच्या सुविधांचा लाभ घेता यावा आणि त्यांना मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावता यावा यासाठी, प्रशासनाने प्रभाग रचनेत या वसाहतीचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.भविष्यात लोक मतदान वंचित राहतील.
नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाकडे निवेदन दिले असून, त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे निवडणुकीतील सहभाग वाढेल आणि स्थानिक पातळीवरील विकासाला गती मिळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.