कोल्हापूर टाइम्सच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश: कागलमधील खड्डे बुजवले!

कागल (सलीम शेख ) : काही दिवसांपूर्वी कोल्हापूर टाइम्स या स्थानिक वृत्तवाहिनीने कागल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत हे खड्डे सिमेंट आणि खडीने भरून काढले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी महाराज चौकातील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांचा धोकाही वाढला होता.
या समस्येवर प्रकाश टाकत प्रशासनाला जाग आणली. पावसाळ्यामुळे डांबरीकरणाचे प्लांट बंद असल्याने प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सिमेंट आणि खडीचा वापर करून खड्डे मुजवले. प्रशासनाच्या या जलद कार्यवाहीचे नागरिकांनी कौतुक केले आहे. तसेच, या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील कागल यांचेही नागरिकांनी आभार मानले आहेत.
एकंदरीत, स्थानिक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनेलच्या सक्रियतेमुळेच हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यामुळे लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.