कागलमध्ये रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब बाजूला हलवण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान; कामाला गती देण्याची मागणी

कागल (सलीम शेख ) : कागल शहरातील रत्नाकर मेडिकल ते खर्डेकर चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरत होते. यामुळे अपघातांचा धोका वाढला होता, तसेच वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. या समस्येबाबत प्रशासन आणि नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, अखेर कागल महावितरणने हे खांब रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्याच्या नूतनीकरण कामाला सुरुवात केली आहे. या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग अनेक दिवसांपासून या खांबांमुळे नागरिक त्रस्त होते. रस्त्यात मधोमध खांब असल्याने विशेषतः सायंकाळच्या वेळी आणि वर्दळीच्या वेळी मोठी गैरसोय होत होती. यावर उपाययोजना करावी अशी मागणी सातत्याने होत होती. नागरिकांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या अथक प्रयत्नांनंतर महावितरणने या मागणीची दखल घेतली आहे.
सध्या हे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यामुळे रस्ता अधिक प्रशस्त होऊन वाहतूक आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे. महावितरणच्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. महावितरणने नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन कामाला अधिक गती द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी करत आहे.