महाराष्ट्र ग्रामीण

मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने भाजीपाल्याचे दर चढेच, फळभाज्या ८० ते ९० रुपये किलो!

कागल (सलीम शेख ) : कागल आठवडी बाजारात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार धक्क्यामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक लक्षणीयरीत्या घटली असून, सलग दुसऱ्या आठवड्यात भाजीपाल्याचे दर तेजीत राहिले आहेत. टोमॅटो वगळता इतर प्रमुख फळभाज्यांचे दर ७० ते ९० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे निचरा न होणाऱ्या जमिनीतील भाजीपाला कुजला. त्यामुळे बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण घटले आहे. किरकोळ बाजारात सध्या वांगी ८० ते १०० रुपये, मिरची ८० रुपये, ढब्बू मिरची १०० ते १२० रुपये, कारली ८० ते १०० रुपये, वरणा १०० ते १२० रुपये, दोडका १०० ते १२० रुपये, बिनीस १४० ते १५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. भेंडीचे दर तुलनेने कमी म्हणजे ४० रुपये प्रति किलो आहेत, तर कोबी २० रुपये प्रति गड्डा आणि फ्लॉवर ३० ते ४० रुपये प्रति नग असे आहेत. मेथी आणि कोथिंबीरच्या पेंढ्या २० ते ३० रुपयांना मिळत आहेत.


चार शेवग्याच्या शेंगांसाठी सध्या ग्राहकांना २० रुपये मोजावे लागत आहेत, जे सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे नाहीत. या दरवाढीमुळे ग्राहकांना दुसरा पर्याय नसल्याने नाइलाजाने वाढीव दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.
फळांच्या बाजारातही बदल:
फळांच्या बाजारात हापूस आंब्याची आवक कमी झाली आहे. त्याऐवजी लालबाग आणि मद्रास आंब्याची आवक वाढली आहे. आंबा काही ठिकाणी १०० ते १२० रुपये प्रति डझनने विकला जात आहे. आंब्याच्या बॉक्सचे दर ३०० रुपये, १४० ते १५० रुपये, ११० ते १२० रुपये आणि १०० रुपये प्रति पेटी असे आहेत. काही ठिकाणी तोडली, कंदमुळे आणि रानभाज्या १२० रुपये प्रति पाव दराने विकल्या जात आहेत.


एकंदरीत, मान्सूनपूर्व पावसाने शेतीत केलेल्या नुकसानीचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून, त्यांना रोजच्या गरजा भागवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button