कोल्हापूर: शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांवर कारवाई न झाल्यास शिवसैनिक उतरणार रस्त्यावर!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ई वॉर्डातील नगर भूमापन क्रमांक २५९, क्षेत्र ५७ एकर १७ गुंठे या शासकीय भूखंडावर झालेल्या प्रचंड अतिक्रमणांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या ८ जानेवारी २०२४ रोजीच्या आदेशाचा संदर्भ देत आणि पुणे विभागीय आयुक्तांच्या २९ मे २०२५ रोजीच्या आदेशानुसार तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, संजय पवार आणि विजय देवणे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८ एप्रिल २०१० रोजी अधिकाराचा गैरवापर करत धनदांडग्यांना फायदा पोहोचवण्यासाठी एक आदेश पारित केला, ज्यामुळे या शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आणि अनेक खरेदीखते करण्यात आली. या आदेशाला स्थानिक सामाजिक सेवा संघटनेने आव्हान दिले होते.
सद्यस्थितीत या भूखंडावर अनेक ठिकाणी पत्र्याचे/सिमेंट काँक्रीटचे कंपाऊंड बांधले गेले असून, त्यात रहिवास, दुकाने, टपऱ्या आणि विविध व्यवसाय कोणत्याही परवानगीशिवाय सुरू आहेत. याकडे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “भाजीची टोपली, रस्त्यावरील जाहिरात फलक, एखाद्या गरिबाचा जिना, झोपडी किंवा दुकानावरील शेड यांच्यावर कारवाई करणारे अधिकारी या महत्त्वाच्या विषयावर अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवतील का?” असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.
या सरकारी भूखंडात अनेक शासकीय पदांवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनीही जमिनी घेतल्या असून अतिक्रमण केले असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे, ज्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेने प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, “येणाऱ्या आठ दिवसात सरकारी हक्कातील जमिनीवर झालेले अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकामे, कंपाऊंडवॉल संबंधित यंत्रणेला आदेश देऊन तात्काळ जमीनदोस्त करावीत अन्यथा शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक या सरकारी जागेवरील बेकायदेशीर बांधकामे स्वतः जमीनदोस्त करतील.”
या निवेदनात कोल्हापुरातील अमेरिकन मिशन जागा, कावळा नाका रेस्ट हाऊस, जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोन यांसारख्या ऐतिहासिक जागा व्हाईट कॉलर लँड माफियांनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत असून, काही राजकीय मंडळी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी त्यांना सहकार्य करत असल्याचाही उल्लेख आहे. भविष्यात अशा जागांवर पार्किंग सुविधांसह सरकारी कार्यालये, भव्य नाट्यगृहे, मंगल कार्यालये यांसारखे प्रकल्प उभारले जावेत, ज्यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.