सीईओंच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीला सुबुद्धी देण्याकरिता गायकवाड कुटुंबीयांचे दंडवत आंदोलन!

कोल्हापूर (सलीम शेख ): कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या कथित भ्रष्टाचारी प्रवृत्तीला सुबुद्धी मिळावी आणि त्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी तिळवणी (ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड सहकुटुंब सोमवार, ७ जुलै रोजी अंबाबाई मंदिर ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत दंडवत घालत साकडे घालणार आहेत. यावेळी ते ‘सीईओंच्या काळ्या कर्तुत्वाचा’ फलक घेऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी निवेदनद्वारे कळवले आहे.
सुनील गायकवाड यांनी आरोप केला आहे की, त्यांचा ७५० स्क्वेअर फुटांचा प्लॉट सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या घरगड्याच्या नावावर केला आहे. या बेकायदेशीर कृत्यात भ्रष्ट ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांनी मदत केली आहे. या विरोधात सीईओंकडे अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून आणि लेखी निवेदने देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा पत्रांना उत्तरेही मिळाली नाहीत, असा गायकवाड यांचा दावा आहे.
गायकवाड यांनी भ्रष्ट ग्रामसेविकेवर बडतर्फीची कारवाई करावी, भूखंड चोर सरपंचांना व ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवून सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, तसेच ठरावाला पाठिंबा देणारी तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत बरखास्त करावी, अशी मागणी केली होती. मात्र, सीईओंकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, त्यांनी यापूर्वी कार्यालयासमोर तीन वेळा उपोषणही केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही त्यांचे काम झाले नसल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
सीईओंच्या या कथित निष्क्रियतेमुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे कोल्हापूरच्या चांगल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या परंपरेला धक्का लागल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करून, अंबाबाईने सीईओंना योग्य बुद्धी द्यावी आणि त्यांना एका मागासवर्गीय युवकाला त्याचा प्लॉट परत मिळवून देण्याची सुबुद्धी द्यावी, असे साकडे घालणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.