जरग विद्यामंदिर येथे ६ किलोवॅट सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिराच्या इमारतीवर बसवण्यात आलेल्या ६ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन नुकतेच पार पडले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागताने उपस्थितांना भारावून टाकले.
आपल्या दर्जेदार आणि विद्यार्थीभिमुख शिक्षणामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. यामुळे शाळेच्या वीज खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार महाडिक यांनी माहिती दिली की, लवकरच महानगरपालिकेच्या सर्व इमारतींवर अशा प्रकारे सौर पॅनल बसवून महापालिकेवर पडणारा वीज बिलाचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामुळे महानगरपालिकेच्या खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरणपूरक ऊर्जा वापरालाही प्रोत्साहन मिळेल.