महाराष्ट्र ग्रामीण

अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करणार: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा इशारा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महिलांच्या अवैध आणि अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला आहे. गर्भलिंग निदान (PCPNDT) कायद्याच्या दक्षता समितीमार्फत या प्रकारांवर कठोर नियंत्रण ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये महिला ऊसतोड कामगारांच्या अनावश्यक आणि अवैध गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात असल्याच्या वृत्तपत्रांतील वृत्तांची आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात विधानपरिषद सदस्या चित्रा वाघ यांनी मागणी केलेल्या बैठकीचे आयोजन आरोग्यमंत्र्यांनी आपल्या दालनात केले होते.
या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, विधानपरिषद सदस्या चित्रा किशोर वाघ, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू रंगा नायक, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भाशय शस्त्रक्रियेचा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्याचे नमूद करत, शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच शस्त्रक्रिया होतील याबाबत दक्ष राहण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले. तसेच, अवैध गर्भपिशव्या काढल्याच्या तक्रारींचे सनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर महिलांना होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या. महिलांच्या आरोग्याबाबत कोणतीही चुकीची बाब खपवून घेतली जाणार नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
PCPNDT कायद्यांतर्गत खासगी रुग्णालयांकडून दरमहा अहवाल घेऊन अवैध प्रकार घडू नयेत यासाठी नियंत्रण ठेवले जाते. त्याच धर्तीवर गर्भाशय शस्त्रक्रियांच्या अहवालाचीही विभागाने पडताळणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच, सर्व वैद्यकीय अधीक्षक आणि ग्रामीण रुग्णालय स्तरावरही गर्भाशय शस्त्रक्रियेस परवानगी देण्यापूर्वी शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button