कोल्हापुरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी; महिलांकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना!

कोल्हापूर (सलीम शेख ) : महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आतुरतेचा दिवस असलेला वटपौर्णिमा सण कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असून, विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत वडाच्या झाडाचे पूजन करतात.
आज सकाळी शहरातील विविध भागांतील वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी दिसून आली. नववधूंसह अनेक विवाहित महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून वटपौर्णिमेचे व्रत पाळले. दिवसभर उपवास करून महिलांनी भक्तिभावाने वडाच्या झाडाला दोरा, बांगड्या, कापूस, फळे आणि आवळा अर्पण करून पारंपरिक पद्धतीने पूजन केले. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारत त्यांनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशी देवाकडे मनोभावे प्रार्थना केली.
यावेळी अनेक महिलांनी पारंपरिक गाणी गाऊन सणाचा आनंद द्विगुणीत केला. एकमेकींची ओटी भरून आणि शुभेच्छा देत या सणाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. वटपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो पती-पत्नीच्या अतूट नात्याचे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांनी हा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरा करत आपली संस्कृती जपली.