ओमकार भिसे यांच्या कुटुंबीयांसाठी कोल्हापुरात मदतीचा ओघ, कलाकार सहाय्यता निधीतून १ लाखाचा धनादेश सुपूर्द!

कोल्हापूर (सलीम शेख ) : सुप्रसिद्ध ढोलकवादक स्मृतिशेष ओमकार भिसे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या निराधार कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापुरातील कलाकार आणि रसिकांनी पुढाकार घेतला आहे. ‘अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन’च्या वतीने ‘एक शाम कलाकार के नाम’ या शीर्षकाखाली हिंदी-मराठी गाण्यांची एक भावपूर्ण सांगीतिक मैफल शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या मैफलीतून जमलेल्या कलाकार सहाय्यता निधीचा तब्बल १ लाख रुपयांचा धनादेश ओमकार भिसे यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
ओमकार भिसे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्ता मुलगा गमावल्याने कुटुंब निराधार झाले आहे. त्यांच्या याच दुःखात सहभागी होत, समाजातील संवेदनशीलता जपण्यासाठी ही मैफल आयोजित करण्यात आली होती.
या मैफलीला सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी गायलेल्या ‘भावा बोल ना’ या गाण्याने उपस्थितांच्या काळजाला हात घातला. या कार्यक्रमात विक्रम पाटील, हणमंत चौगुले, सचिन देसाई, गणेश साळुंखे, दर्शन सुतार, विश्वनाथ चौगुले, कृष्णात माने, अभिजित लोखंडे या वादक कलाकारांनी आपल्या वादनाने मैफलीत रंग भरले. तर सिद्धराज पाटील, सीमा सोनार, दीपकराज साळुंखे, सई लाकडे, शफिक मुल्ला, आम्रपाली कुरणे, अभिषेक चव्हाण, रविराज सदाजय, प्रशांत शिराळे, सनी समुद्रे या गायकांनी आपली भावस्पर्शी गाणी सादर करून उपस्थितांचे डोळे पाणावले. निवेदक प्रवीण बनसोडे यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमाला आणखीनच उंची मिळाली.
फाउंडेशनचे अध्यक्ष, गायक आणि संगीतकार कबीर नाईकनवरे यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रसिक श्रोत्यांनी भरभरून मदत केली.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी, चेअरमन प्रा. आनंद भोजने सर, डॉ. प्रवीण कोडोलीकर, डॉ. कपिल राजहंस, डॉ. जगन कराडे, प्रा. एस. एस. महाजन, सतीश माळगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ओमकार भिसे यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वच कलाकारांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या संवेदना व्यक्त केल्या, ज्यामुळे मैफलीला एक वेगळाच भावनिक स्पर्श लाभला.