ठाकरे गटाला कोल्हापुरात धक्का: हर्षल सुर्वेंचा शहरप्रमुख पदाचा राजीनामा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) कोल्हापूर जिल्ह्यातून नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या घोषणेनंतर अवघ्या दोन दिवसांतच धक्क्याने हादरली आहे. पक्षाने नव्याने जिल्हाप्रमुख म्हणून रविकिरण इंगवले यांची, तर शहरप्रमुख म्हणून हर्षल सुर्वे यांची नियुक्ती केली होती. मात्र, हर्षल सुर्वे यांनी जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांना शहरप्रमुख पद मिळाल्याने ते नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी अखेर शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.
हर्षल सुर्वे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. या राजीनामा पत्रात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले आहे की, “साहेब, माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही, त्यामुळे मनातील खंत व्यक्त केली होती. मात्र, आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली, तीच जास्त जिव्हारी लागली.”
सुर्वे यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे, “आजपर्यंत आदेश मानून काम केले होते. कधी आदेश डावलला नाही, पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला, की निर्णय मान्य नसेल तर निघून जा. मला निर्णय मान्य नाही, त्यामुळे साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जात आहे. मी माझा पदाचा आणि सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा देत आहे.”
या राजीनाम्याचे पत्र सुर्वे यांनी शिवसेना सचिव विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते संजय पवार यांना व्हॉट्सॲपद्वारेही पाठवले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.