कोल्हापूर संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीतील प्रमुख चर्चा आणि निर्णय:
* पर्जन्यवृष्टीचे नियोजन: १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य पर्जन्यवृष्टीवर सविस्तर चर्चा झाली आणि त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.
* नालेसफाई: शहरातील नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊन पूरस्थिती टाळता येईल.
* धरण पाणीसाठा आणि विसर्ग: जिल्ह्यातील विविध धरणांमधील पाणीसाठा आणि त्यातून होणाऱ्या विसर्गाचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
* अलमट्टी आणि हिप्परगा धरणांवर लक्ष: अलमट्टी आणि हिप्परगा धरणांमधील पाणीसाठ्यावर नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, कारण या धरणांतील पाणी पातळीचा कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर परिणाम होतो.
या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची खात्री दिली. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.