कोल्हापुरात सिग्नल बंदमुळे वाहतूक कोंडी, नागरिक हैराण!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बंद असल्याने शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी सिग्नल सुरू असले तरी, बहुतांश ठिकाणी ते बंद अवस्थेत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विशेषतः नोकरदार वर्गाला वेळेवर कार्यालयात आणि इतर कामांवर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सकाळी आणि सायंकाळी कामाच्या वेळी ही कोंडी अधिकच गंभीर रूप धारण करत आहे. दुचाकी, चारचाकी आणि तीन चाकी रिक्षाचालक या सर्वांनाच यामुळे मनस्ताप होत आहे. सिग्नल बंद असल्याने चौकांमध्ये वाहनांची गर्दी होते आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे इंधनाचा अपव्यय होतो, वेळेचा अपव्यय होतो आणि मानसिक ताणही वाढतो.
वाहनचालकांकडून सर्व सिग्नल त्वरित सुरू करून वाहतूक सुरळीत करण्याची जोरदार मागणी होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.