शिवसेनेच्या (उबाठा) सर्वच आमदार आणि खासदार यांना उद्धव ठाकरेंनी दिले जेवणासाठी आमंत्रण! महत्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता!

मुंबई (न्यूज नेटवर्क): आजकाल महाराष्ट्राच्या राजकारणात खूपच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राजकीय बैठकांना ऊत आला आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील घटकपक्षांना गळती लागली आहे. ठाकरे गट, काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार आणि खासदारांना खास जेवणासाठी आमंत्रित केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या सर्व आमदार आणि खासदार यांना जेवणासाठी आमंत्रित केलंय. 20 जून रोजी मुंबईतील ताज लँड्समध्ये डिनर डिप्लोमसीचा हा कार्यक्रम होणार असल्याचे समजते. ठाकरेंनी सर्वच आमदार आणि खासदारांना या जेवणासाठी बोलावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी आमदार, नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी काळात काही खासदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसारमाद्यामांधून आल्या होत्या. विशेष म्हणजे ठाकरे पक्षातील खासदार शिंदे गटात जाणार असून त्यासाठी चाचपणी केली जातेय, अशीही माहिती सूत्रांकडून आली होती. त्यामुळे ठाकरेंनी दिलेल्या या जेवणाच्या आमंत्रण कार्यक्रमात या विषयावर काही चर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यासाठी रणनीती आखली जात आहे. ठाकरे यांच्या पक्षासाठी तर मुंबईची पालिका निवडणूक फारच प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चय ठाकरे गटाने केला आहे. तसेच ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक यासारख्या महापालिकाही ठाकरे गटासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे आमदार खासदारांसोबतच्या डिनर डिप्लोमसीमध्ये उद्धव ठाकरे याविषयीही काही मार्गदर्शन करणार का? असे विचारले जात आहे.