नेर्लीचे सरपंच प्रकाश धनगर अपात्र; ६ वर्षांसाठी निवडणुकीस बंदी!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील नेर्लीचे सरपंच प्रकाश धनगर यांना अपहार, ग्रामपंचायतीच्या कामकाजात हलगर्जीपणा आणि मनमानीपणा केल्याप्रकरणी सरपंच व सदस्य पदावरून हटवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी २० जून रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. यामुळे धनगर यांची ११ नोव्हेंबर २०२८ पर्यंत असलेली मुदत संपुष्टात आली असून, त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.
या प्रकरणी निखिल पाटील आणि १६ जणांनी प्रकाश धनगर यांच्या विरोधात जिल्हा परिषदेत तक्रार दाखल केली होती. काही तक्रारदारांनी नंतर आपली तक्रार मागे घेतली होती. करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून १० जून २०२४ रोजी अहवाल सादर केला होता. त्यानंतर यावर सात सुनावण्या घेण्यात आल्या आणि २२ मे २०२५ रोजी सुनावणी कामकाज पूर्ण होऊन प्रकरण निर्णयासाठी बंद करण्यात आले होते. यानंतर विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिला आहे.
१० लाखांच्या कामात अपहार आणि अनियमितता:
गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, सुमारे १० लाख रुपयांच्या कामांमध्ये अपहार, अनियमितता आणि बोगसपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ग्रामसेवकाशी संगनमत करून रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला पाणीपुरवठा, सुशोभीकरण, फर्निचर, अंगणवाडी खेळणी, आरओ प्लांट, मागासवर्गीय वस्तीमध्ये सोलर दिवे आणि आरओ फिल्टर यांवर १० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यापैकी आरोग्य विभागाच्या कामावर प्रत्यक्षात फक्त ३४ हजार रुपये खर्च झाले असून, तब्बल ३ लाख ६९ हजार रुपये जादा खर्च दाखवून अपहार केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, केवळ समाजमंदिरात एक वॉटर फिल्टर बसवले असतानाही आरओ फिल्टर बसवल्याचे दाखवून १ लाख १४ हजार रुपये खर्च दाखवण्यात आला आहे.
या निकालावर प्रतिक्रिया देताना प्रकाश धनगर यांनी म्हटले आहे की, “मी भ्रष्टाचार केलाच नाही. मनमानी कारभार म्हणजे भ्रष्टाचार नव्हे. माझ्यावर खोटे आरोप करून सरपंचपद काढले जात असेल, तर मी न्यायालयात अपील करून न्याय मागणार आहे. कारण मी भ्रष्टाचार केलेला नाही.”