कोल्हापूर पोलीस लाईनमध्ये मूलभूत सुविधांच्या तातडीने पूर्ततेची रिपब्लिकन पक्षाची मागणी!

कोल्हापूर (सलीम शेख) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कोल्हापूरने एस.पी. ऑफिससमोरील पोलीस लाईन परिसरात वास्तव्यास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी तातडीने वीज, पाणी, रस्ते आणि शौचालयासह इतर मूलभूत सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते सतीश माळगे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन दिले असून, सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पोलिसांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष
सतीश माळगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पोलीस लाईन परिसरातील निवासस्थानांमध्ये कार्यरत पोलिसांची कुटुंबे राहतात, परंतु या भागात अद्यापही रस्ते नाहीत. यामुळे रात्री-अपरात्री ये-जा करताना पोलीस बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची अपुरी सोय आणि सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था यामुळे रहिवाशांना मोठा त्रास होत आहे.
वाढता धोका आणि अंधाराचा साम्राज्य
याशिवाय, रात्रीच्या वेळी परिसरात घोणस, साप, विषारी नाग यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे, ज्यामुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते. परिसरात विजेची सोय नसल्याने रात्रीच्या वेळेस सर्वत्र अंधार असतो. प्रवेशद्वारासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही संरक्षण आणि विजेची सोय नसल्याने तो भाग भयावह दिसतो. रात्री ड्युटीवरून परतणाऱ्या महिला आणि पुरुष पोलिसांना या अंधारात कुत्र्यांच्या हल्ल्याचाही धोका असतो, कारण तिथे मोठ्या संख्येने गावठी कुत्री फिरत असतात.
वेतनातील कपात आणि सुविधांचा अभाव
माळगे यांनी निदर्शनास आणून दिले की, पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा नऊ हजार रुपये कपात केली जाते, परंतु त्या प्रमाणात त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. या परिसरात सुमारे २०० ते २५० कुटुंबे राहत असून, त्यांना मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित ठेवणे हा त्यांच्यावर मोठा अन्याय आहे.
सात दिवसांचा अल्टिमेटम
सतीश माळगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सात दिवसांच्या आत मूलभूत सुविधांची पूर्तता करावी आणि पोलीस बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी उमेश माने (आण्णा), सात्ताप्पा कांबळे, प्रवीण सौंदलगे, सलमान मौलवी, किशोर कांबळे, रशीद भाई, भूषण भांदिगरे, संग्राम पाटील, संतोष कांबळे, रणजीत कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.