राजारामपुरी पोलिसांची मोठी कारवाई: कर्नाटकातून आलेल्या दोन गांजा तस्करांना ९ किलो गांजासह अटक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गांजा सेवन करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत राजारामपुरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कर्नाटकातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ९ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ५ लाख ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, एक ग्रे रंगाची स्विफ्ट कारमधून सरनोबतवाडी टोलनाका मार्गे विक्रीसाठी गांजा आणला जाणार आहे. या माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ राजाराम तलाव येथील स्ट्रॉंग रूमजवळ सापळा रचला. संशयित स्विफ्ट कार येताच पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांच्या ताब्यातील कारची डिकी तपासली असता, त्यात गांजा आढळून आला. आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी हा गांजा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली असून, यामुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.