राजारामपुरी येथे बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक!

कोल्हापूर (सलीम शेख ) : राजारामपुरी पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६०,००० रुपये किमतीची मोपेड, मोबाईल हँडसेट, एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार राऊंड असा एकूण १ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती पिस्तूल घेऊन सरनोबतवाडीमार्गे कोल्हापूरमध्ये येणार आहे. या माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलिसांनी सरनोबतवाडी टोलनाका येथे सापळा रचला.
सापळा लावून संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आणि त्याची झडती घेतली असता, त्याच्या मोपेडच्या डिकीमध्ये गावठी बनावटीचे एक पिस्तूल, चार राऊंड आणि एक मोबाईल हँडसेट मिळून आले. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करत आहेत.