अंबाईवाड्यात शॉर्टसर्किटने घर जळून खाक; गावडे कुटुंबाला मदतीचा हात, आमदार विनय कोरेंकडून घरकुलाचे आश्वासन!

अंबाईवाडा (सलीम शेख ) : शाहूवाडी तालुक्यातील अंबाईवाडा येथील निनू काळू गावडे आणि बाळू काळू गावडे या दोन सख्ख्या भावांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील धान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना घडली तेव्हा गावडे कुटुंबातील सर्व सदस्य डोंगरकपारीतील शेतीकामासाठी गेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अंबाईवाडा हे चांदोली धरण भागातील उखळू गावाच्या दुर्गम जंगल परिसरात वसलेले आहे.
घटनेची माहिती मिळताच, आमदार विनय कोरे यांनी तातडीने गावडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी कुटुंबाला तातडीची मदत म्हणून धान्य, कपडे, अंथरूण आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या. या दुर्घटनेमुळे गावडे कुटुंबावर आलेल्या संकटात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार कोरे यांनी दिले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आमदार विनय कोरे यांनी यावेळी घोषणा केली की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाहूवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून निनू काळू गावडे आणि बाळू काळू गावडे यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करून ते बांधून दिले जाईल. या आश्वासनामुळे निराधार झालेल्या गावडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), शाहूवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य अमर खोत (आप्पा), विरळे गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील, रंगराव पाटील – शित्तूर, उखळू गावच्या सरपंच भाग्यश्री उमेश टोटपल, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विकास बाळतुगडे, माजी उपसरपंच दिपक नथुराम गावडे, माजी उपसरपंच निवृती खोत, सेवा सोसायटी चेअरमन विलास पांडुरंग पाटील, तसेच राजाराम मुटल, ज्ञानदेव वडाम, दगडू भिसे, शिवाजी बैघर, तुकाराम झोरे (सर), नथुराम खोत, बबन गावडे, शामराव वकटे, बंडू संपकाळ आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी गावडे कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करत त्यांना मदतीचा हात दिला.
ही घटना उखळू गावाच्या जंगल भागात घडल्याने मदतीसाठी पोहोचणे थोडे कठीण होते, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन गावडे कुटुंबाला आधार दिला. प्रशासनानेही या कुटुंबाला लवकरात लवकर सर्वतोपरी मदत करून त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.