महाराष्ट्र ग्रामीण

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन पट्टणकोडोलीत उत्साहात साजरा!

पट्टणकोडोली (सलीम शेख ) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन पट्टणकोडोली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देव, देश, धर्म आणि ८०% समाजकारण, २०% राजकारण हे ध्येय घेऊन बाळासाहेबांनी लावलेल्या भगव्या रोपट्याचे आज विशाल वृक्षात रूपांतर झाले असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अविरत सुरू आहे.


या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक शिवसेना उप जिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी यांनी केले. पट्टणकोडोली हा शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहायला हवा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पट्टणकोडोलीमध्ये भगवाच फडकला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा कडवटपणे प्रचार करून भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.


ज्येष्ठ शिवसैनिक किसन तिरुपणकर यांनी बाळासाहेबांचा शिवसैनिक यापुढे हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत पट्टणकोडोली मतदारसंघात भगवा फडकवणारच, असे ठामपणे सांगितले. बाळासाहेबांचे विचार आणि आचार प्रत्येक शिवसैनिक पाळेल आणि शिवसेना पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.
पट्टणकोडोली शहरप्रमुख शिवानंद पणदे यांनी संपूर्ण शिवसैनिकांनी सलोखा राखून एकजुटीने शिवसेना पुढे नेण्याचे आवाहन केले. उपतालुकाप्रमुख महेश माळी यांनी सच्चा आणि कडवट शिवसैनिक कसा असतो याची उदाहरणे देत आगामी काळात शिवसेनेच्या प्रचंड वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत भगवा फडकावावा, असे आवाहन केले आणि उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिवसैनिक अशोक हुपरे, किसन तिरुपणकर, महेशकुमार नाझरे, संभाजी माळी, गोरखनाथ माळी, मारुती तोडकर, आनंदा मोरे (आलाटवाडी), गुंडा तांबे (वस्ताद रेंदाळ), कामगार आघाडी तालुकाप्रमुख सुनील बारैय्या, प्रवीण चव्हाण, तानाजी शिंदे, सुनील दळवे, प्रथमेश पाटील, विनायक तोडकर, विशाल तोडकर, शिवाजी कोळी, वैभव पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button