मॅक असोसिएशनद्वारे दिव्यांगांसाठी रोजगारभिमुख प्रशिक्षणाचे उद्घाटन; सर्वांगीण विकासाचे नवे दालन खुले!

उचगाव (सलीम शेख ) : दिव्यांगांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देत त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी मॅक असोसिएशनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मॅक असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशीरे यांनी नुकतेच जाहीर केले की, दिव्यांगांसाठी रोजगारभिमुख प्रवेशद्वार खुले झाले असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आणि सहज पेलता येणारे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मॅक असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल.
पर्सन विथ डिसएबिलिटी बेंगळूरु, महिला कल्याण संस्था बेळगाव, युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी आणि हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० दिवसांच्या मोफत रोजगारविषयक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे होते.
यावेळी बोलताना महिला कल्याण संस्थेच्या वैजयंती चौगुला यांनी सामाजिक संस्थांच्या योगदानाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, सामाजिक क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान प्रेरणादायी राहिले आहे. दिव्यांग युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणासोबतच रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल.
हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपली संस्था नेहमीच मार्गदर्शक राहिल्याचे सांगितले.
या उद्घाटन समारंभास महिला कल्याण संस्थेच्या सचिव वैजयंती चौगुला, युवा संस्थेचे स्थलांतरित कामगार लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्पांचे व्यवस्थापक मोहन सातपुते, मॅकचे सेक्रेटरी शंतनू गायकवाड, विश्वस्त मनोहर देशभ्रतार, सुजाता गारे, जयश्री गोखले, तानाजी देसाई, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील, किरण चौगुला, छाया देसाई, प्रशिक्षक प्रज्ञा मगर आणि विराज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले. निखिल बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि शिवाजी पाटील यांनी आभार मानले. या प्रशिक्षणामुळे दिव्यांगांना त्यांच्या क्षमता ओळखून आत्मनिर्भर होण्यास मदत मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.